Saturday, 8 February 2014

मराठी वाचकांसाठी तालुकास्तरीय वक्तृत्त्व स्पर्धा २०१४



मराठी वाचन संस्कृतीचे जतन करण्यासाठी तालुका, जिल्हा, राज्य अशा विविध स्तरांवर वाचक स्पर्धा दरवर्षी भरवण्यात येतात. मालवण तालुक्याची वक्तृत्त्व स्पर्धा दि. ०१ फेब्रुवरी २०१४ रोजी भरविली होती. अजिबात डामडौल नसलेले पण नीटनेटके स्वच्छ सभागृह आणि तसाच साधा पण नेटका रंगमंच. रंगमंचासन्मुख उभे राहिल्यावर डावीकडच्या भिंतीकडे साहित्यप्रेमी वाचकाची दृष्टी वळते. केतकर, गदिमा, इ. वंदनीय साहित्यिकांच्या प्रतिमांकडे दृष्टी वळल्यावर आपण आदराने नतमस्तक होतो. अशी सुरेख वातावरणनिर्मिती झाली होती. नेहमीप्रमाणेच ग्रंथपाल श्री. संजय शिंदे यांचे उत्साहवर्धक नेतृत्व आणि आयोजनातील प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष सहभाग कार्यक्रमाला वेगळ्याच उंचीवर घेऊन गेला. या वर्षी स्पर्धक संख्या उल्लेखनीय रीत्या वाढलेली आढळून आली होती.



श्री. संजय शिंदे यांच्या प्रास्ताविकानंतर प्रथेप्रमाणे दीपप्रज्वलन करून आणि सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.












दीपज्योतींनी वातावरण पवित्र, मंगलमय होऊन गेले. मालवण येथील भंडारी विद्यालयाचे वंदनीय सेवानिवृत्त अध्यापक श्री. वराडकर आणि त्याच विद्यालयातील माननीय अध्यापिका सौ. खंडागळे यांनी परीक्षकपदे भूषविली होती.

श्री. संजय शिंदे यांच्या स्वागतपर भाषणात त्यांनी उपस्थितांना परीक्षकांचा परिचय करून दिला. नंतर परीक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. श्री. शरद कदम आणि श्री. सुधीर कांदळकर या कांदळगावहून आलेल्या साहित्यप्रेमी ग्रंथालय सदस्यांचा देखील गुलाबपुष्प देऊन सन्मान केला.




परंतु काही तातडीचे वैयक्तिक काम निघाल्यामुळे त्यांना लगेच निघावे लागले त्यामुळे श्री शिंदे यांनीच स्पर्धा सुरू झल्याची घोषणा केली. दुर्दैवाने श्री कुशे हे एकाही स्पर्धकाचे भाषण ऐकू शकले नाहीत.





प्रत्येक स्पर्धकाने आपले नाव, आपण अध्ययन करीत असलेली शिक्षणसंस्था याचा भाषणाच्या सुरुवातीसच परिचय करून द्यावा अशी सूचना पुढील स्पर्धकांना श्री शिंदे यांनी दिल्या












दोन स्पर्धक शालेय विद्यार्थिनी काही कारणाने स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच निघून गेल्या होत्या. नंतर परीक्षकांची भाषणे झाली.



बहुतेक स्पर्धकांना दहा मिनिटांची वेळ पुरेशी झाल्याचे आढळले नाही त्यामुळे ही वेळ जास्त ठेवावी अशी सूचना आयोजकांना करीत त्यांनी स्पर्धकांना अमूल्य असे मार्गदर्शन केले. भाषणाचा आराखडा, रचना कशी असावी याची कल्पना स्पर्धकांना दिली.

नंतर श्री शिंदे यांनी परीक्षकांचा आदर राखूनच ध्वनीक्षेपकावरून नम्रपणे जाहीर केले की पुढच्या फेरीतल्या जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धात दहाच मिनिटे वेळ दिलेली आहे त्यामुळे या वेळेत बदल होऊ शकत नाही. मान्यवर परीक्षकांचा अधिक्षेप न करता दाखवलेली ही समयसूचकता प्रशंसनीयच म्हणावी लागेल.

मा. श्री. वराडकर आपल्या भाषणासाठी मंचावर आले. धीरगंभीर स्वर, आत्मविश्वासपूर्ण अस्खलित






शब्दोच्चार, समर्पक शब्दयोजना याचा उत्कृष्ट नमुना सादर करीत वराडकर सरांनी श्रोतृवृंदाला भुरळ पाडून जिंकून घेतले. स्पर्धकांच्या भाषणात विस्कळीतपणा कसा आहे हे त्यांनी स्पर्धकांना नाउमेद न करतां कौशल्याने पटवून दिले आणि आत्मपरीक्षणाचे महत्त्व सांगितले. मांडणीत प्रस्तावनेला आणि आशयगर्भाला किती वेळ द्यावा, आशयविस्ताराला किती वेळ द्यावा आणि निष्कर्ष किंवा आपले मत व समारोप याला किती वेळ द्यावा याचे मार्गदर्शन केले. पुस्तकावर बोलतांना त्यात समीक्षा असावी. भाषणाच्या रचनेला त्यांनी फुलाची उपमा दिली. पाकळ्या जशा केसराच्या मध्याभोवती असतात तसे भाषणाचे भाग आशयाला मध्यभागी ठेवून रचावेत. एका स्पर्धकाने भाषणात कॅरॅक्टर हा शब्द वापरला होता त्याऐवजी भूमिका किंवा पात्र हा मराठी शब्द वापरावा असे ते म्हणाले. आपले उच्चार कसे स्पष्ट असावेत, परभाषी, खासकरून इंग्रजी शब्द कसे टाळावेत, भाषण कसे रचावे, मांडावे, रुजवावे, फुलवावे हे सांगितले. 

भाषण श्रोत्यांसमोर मांडतांना अभिनय हवाच, देहबोलीत आत्मविश्वास दिसावा, परंतु आक्रमक अभिनिवेश नसावा असे ते पुढे म्हणाले. 

नंतर निकाल जाहीर झाला. तृतीय पारितोषिक अक्षय सखाराम सातार्डेकर याला सौ. खंडागळे यांच्या हस्ते, 

 
द्वितीय पारितोषिक रेणुका अशोक निव्हेकर हिला श्री. शरद कदम यांच्या हस्ते 

 आणि शेवटी प्रथम पारितोषिक शंकर अशोक काळसेकर याला श्री. वराडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.




कार्यक्रमाचा एकंदरीत विचार करतांना काही गोष्टी खटकल्या. पहिली गोष्ट म्हणजे मुख्य वक्ते सभागृहातून अचानक गायब झाल्यास स्पर्धक नाउमेद होऊ शकतात. वक्त्यांनीच अशी अनास्था दाखविल्यास कार्यक्रमाची शिस्त बिघडते. इथे काहीही केले तरी चालते असा त्यांचा गैरसमज होतो. स्पर्धकाचे भाषण चालू असतांना इतर स्पर्धक आपसात बोलत होते. हे नक्कीच बेशिस्तपणाचे आणि आक्षेपार्ह आहे. अशा वेळी आयोजकांनी किंवा परीक्षकांनी त्यांना शिस्त लावली पाहिजे. हा संस्कृतिक कार्यक्रम आहे आणि आपण या संस्कृतीचे शिस्तबद्ध पाईक आहोत हे उपस्थितांनी कधीही विसरता नये. मालवण हे पर्यटनस्थळ आहे. परदेशी पर्यटकांना सांस्कृतिक कार्यक्रमात स्वारस्य असते. अशा सांस्कृतिक कार्यक्रमांना अगोदर माहिती असल्यास ते मुद्दाम उपस्थित राहतात. त्यांच्यापुढे असे प्रकार घडल्यास आपल्या संस्कृतीबद्दल त्यांचे वाईट मत होऊ शकते. त्याहीपेक्षा उपस्थित स्थानिक साहित्यप्रेमींनाच ते जास्त खटकते हे ध्यानात घेतले पाहिजे. या देखण्या कार्यक्रमाला हे एक गालबोट लागलेच.

दुसरी गोष्ट म्हणजे स्पर्धकांचे अशुद्ध उच्चार. एका स्पर्धकाने तर असहाय्य हा शब्द असह्य असा उच्चारला. नवख्या स्पर्धकाला आलेला जाणकार श्रोतृवृंदाचा ताण किंवा दडपण हे त्याचे कारण असू शकते. बहुसंख्य स्पर्धक हे डी. एड. चे विद्यार्थी म्हणजे उद्याचे शिक्षक आहेत हे ध्यानात घेतले तर या गोष्टीचे गांभीर्य जाणवते. यांचे विद्यार्थी देखील असेच अशुद्ध उच्चार करणार कां असा प्रश्न समोर उभा राहिला.


जिल्हास्तरीय स्पर्धा कुडाळ इथे दि. ९ फेब्रुवारीला होणार असे श्री शिंदे यांनी जाहीर केले. यावर एक कार्यशाळा आयोजित करून मालवणच्या स्पर्धकांना मार्गदर्शन करावे अशी सूचना श्री सुधीर कांदळकर यांनी केली ती श्री शिंदे यांनी त्वरित स्वीकारली आणि तसे घोषितही केले. शिंदे यांचा तत्पर प्रतिसाद वाखाणण्याजोगा आहे.

स्पर्धकांकडे भाषणकौशल्य आहे, स्वतःची शैली आहे. भाषण प्रथम विस्ताराने कसे लिहावे. नंतर ते घड्याळ लावून कसे साभिनय वाचावे, आशयाला बाधा न आणता, कोणती वाक्ये कापावीत, काटछाट, लिहिलेल्या भाषणातील शब्द बदलून जास्त परिणामकारक, समर्पक, आशयघन शब्द कसे पेरावेत, काही वाक्यांची वाक्यरचना बदलून जास्त परिणामकारक वाक्ये कशी तयार करावीत, संपादन कसे करावे, याचे मार्गदर्शन स्पर्धकांना करणे जरूरीचे आहे. एखाद्या पुस्तकाचा आशय कसा मांडावा, ते आपल्याला का आवडले याची कारणमीमांसा म्हणजे रसास्वाद कसा मांडावा, लिखाणातली सौंदर्यस्थळे कशी उलगडून दाखवावीत, स्पर्धेतील भाषणात टीका वा समीक्षा सहसा नसावी, तो अधिकार फक्त संशोधन स्तरावरील अध्ययन केलेल्यांनाच कां आहे, अशा गोष्टींचे मार्गदर्शन स्पर्धकांना होणे गरजेचे आहे.

पण एकंदरीत कार्यक्रम हा आनंददायी होता आणि कार्यक्रमाचे दोन अडीच तास चांगले गेले. कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन केल्याबद्दल नगरवाचनालयाचे श्री. संजय शिंदे, कु. दीप्ती दळवी इ. चे अभिनंदन.
-    X – X – X –