Thursday 28 March 2013

मराठी भाषा गौरव दिन २०१३

कवि कुसुमाग्रजांचा अर्थात कवि, नाटककार साहित्यिक कै वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन आहे २७ फेब्रुवारी. त्यानिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. २७ फेब्रुवारी २०१३ रोजी त्यानिमित्त महाराष्ट्य़्रातील ठिकठिकाणच्या ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शने भरवली गेली. मालवण परिसरातील पहिले स्थळ अर्थातच नगर वाचन मंदीर.

मुळात या ग्रंथालयातले वातावरण छान आहे. नगरवाचन मंदीर हे नाव तसे सार्थच आहे. मंदिराची शुचिता आणि प्रसन्नता या वास्तूतच जाणवते. डाव्या बाजूला मध्यभागी सरस्वती आणि कुसुमाग्रजांच्या प्रतिमा मांडल्या होत्या. 



बाजूलाच तबकात पुष्पमाला तयार ठेवल्या होत्या.


पुस्तके छान मांडली होती.






प्रसन्नतेत भर पडली. सध्याच्या समाजातल्या इतर सोहळ्यात आणि या सोहळ्यात एक मोठा फरक होता. कर्णकटु संगीताचा पार्श्वगोंगाट पार अनुपस्थित. त्यामुळे बकालपणा आला नाही आणि बरे वाटले. समारंभाचे मान्यवर उद्घाटक उपाध्यक्ष दादासाहेब ऊर्फ उदय मोरे अकराला येणार होते. शिंदेसाहेबांशी जरा गप्पा मारत बसलो.

शरद कदम नाट्यप्रेमी. शिंदेसाहेबही नाट्यप्रेमी. काही वेळाने आणखी एक नाट्यप्रेमी श्री. प्रकाश कुशे देखील गप्पाष्टकात सामील झाले. मला नाटकात फारसा रस नाही. पण खूप रंजक माहिती मिळाली. मामा वरेरकर मालवणचे. त्यांचे मालवणातले घर देखील अजून आहे. म. वा. धोंड पण मालवणचेच. साठसत्तरच्या दशकातल्या नाट्यभारल्या काळात मालवणला अनेक नाटके झाली. त्या स्मृतीरंजनात तिघेही रमले. १९६९ साली मी मे महिन्यात मालवणला गेलो होतो. तेव्हा मी देखील नाट्यसंपदाचे अश्रूंची झाली फुले पाहिले होते. त्या रम्य स्मृतींना माझ्या मनांतच उजाळा मिळाला. प्रभाकर पणशीकर, काशिनाथ घाणेकर आणि चित्तरंजन कोल्हटकर यांच्या भूमिका अजूनही माझ्या स्मरणात आहेत.

नंतर चर्चा छबिलदासवर आणि पीडीए वर वळली. छबिलदासची नाटके मात्र मी बरीच पाहिली आहेत. आतां माझी कळी खुलली. म. वा. धोंडांवरून माधव मनोहर इत्यादींच्या आठवणी निघाल्या. दादरच्या अमर हिंद मंडळातल्या वसंत व्याख्यानमालेत धोंडांची विद्वत्ताप्रचुर, अभिनिवेशपूर्ण, जिवंत व्याख्याने नेहमीच असत. दुटांगी धोतर आणि गडद रंगाचा कोट घातलेले माधव मनोहर ओठात न पेटवलेली सिगरेट ठेवून शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर तशाच प्रकारच्या वेषातल्या त्यांच्या मित्रांच्या कोंडाळ्यात बसलेले असत ते आठवले. डोळ्यांसमोरून असा स्मृतीपट सरकत असतांनाच उद्घाटक आले. दीप प्रज्वलन करून आणि सरस्वतीच्या प्रतिमेला आणि कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पमालार अर्पण करून ग्रंथप्रदर्शनाचे औपचारिक उदघाटन केले.
दीप प्रज्वलन करतांना मा. दादासाहेब मोरे


दीप प्रज्वलन करतांना श्री. प्रकाश कुशे

महिलांनी मग मागे का बरे राहावे?







ग्रंथसेविका दीप्ती



ग्रंथसेविका श्रीमती मसूरकर

दीप प्रज्वलन करतांना ग्रंथपाल श्री. शिंदे


मा. दादासाहेब मोरे प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करतांना



आणखी काही क्षणचित्रे



मग उपस्थितांचे मान्यवरांसोबत चहापान झाले आणि एक साधासुधा, कोणताही बडेजाव, भपका नसलेला पण शिस्तबद्ध, नीटनेटका, सुसंस्कृत असा आनंददायी सोहळा संपन्न झाला. 

मालवणहून आचरामार्गे देवगड रस्ता सुरू झाला की वाटेत डावीकडे बॅ. नाथ पै सेवांगणाने चालविलेले एक ग्रंथालय आहे. तेथेही ग्रंथप्रदर्शन भरले होते.




संध्याकाळी हजेरी लावली कांदळगांवच्या रामेश्वर सार्वजनिक ग्रंथालयात. आश्चर्याचा गोड धक्का बसला. जुन्या पडघाईला आलेल्या इमारतीला ग्रंथप्रेमींच्या उत्साहाने आनंदमेळा भरला होता. इथेही कर्णकटु संगीताचा उपद्रव नव्हता. आबालवृद्ध, सर्व वयोगटातील स्त्रीपुरुष, सर्व ग्रंथप्रेमींनी उपस्थिती नोंदवली होती. मसुर्‍यासारख्या आठदहा किमी. दूरवरच्या गावातून देखील ग्रंथप्रेमी आले होते. मी इवल्याशा गावातल्या या ग्रंथालयाचा अभ्यागत होतो ८४ क्रमांकाचा.  कांदळगांवकरांचा विजय असो. माझ्या उत्साहाचा वारू आता वेगाने दौडायला लागला. प्रतिमाग्राहक सरसावून उगारला आणि सव्यसाची धनुर्धराच्या आवेशात सटासट कळ दाबत सुटलो. 



उत्साहाने भारलेले ग्रंथालयाचे कार्यवाह श्री. पारकर






मागे उभ्या डावीकडून पहिल्या आहेत ग्रंथपाल सौ. पारकर तर सर्वात उजवीकडे आहेत उत्साहाने उपस्थित राहिलेले ग्रंथालयाचे कार्यवाह श्री. पारकर आणि त्यांच्या शेजारी उभे आहेत श्री. शरद कदम.

सर्वात डावीकडे आहेत ग्रंथसेवक श्री. महेश साळकर. एवढ्या तुटपुंज्या जागेत मांडणी उठावदार केली होती.






बाहेरच्या रणरणत्या उन्हामुळे शरद कदम यांना मुखपृष्ठावरचे शहाळे आवडले असेल कां? ऊन खरे पण शहाळे मात्र चित्रातले! बहोत बेइन्साफी है. अन्याय! अन्याय!! अन्याय!!! अन्यायाचा निषेध असो.!




- X - X - X -

तालुका वाचक स्पर्धा 2012



सध्याचे वर्ष हे सुप्रसिद्ध कादंबरीकार, नाटककार आणि साहित्यिक श्री. ना पेंडसे यांचे जन्मशताब्दि वर्ष आहे. त्या निमित्ताने बुधवार दिनांक २६-१२-२०१२ रोजी एक तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.  विषय होता श्री. ना. पेंडसे यांच्या कादंबर्‍या.स्थळ होते




प्रथम ग्रंथपाल श्री. संजय शिंदे यांनी प्रास्ताविकात ग्रंथालयाची ओळख करून दिली. त्यांचे भाषण नीटनेटके आणि छोटेसे आणि त्यामुळे हवेहवेसे वाटणारे होते. मालवण नगरवाचनालय. १०६ वर्षांपासून सुरू असलेली संस्था. ३२ हजारांच्या वर गेलेली ग्रंथसंपदा. ६०० च्या वर गेलेली सदस्यसंख्या. तालुक्याचे ठिकाण असलेल्या एका छोट्याशा, नयनरम्य, टुमदार अशा गाववजा शहरातली ही आकडेवारी नक्कीच कौतुकास्पद आहे. शिंदे यांनी ही आकडेवारी रंजकतेने पेश केली. 




या वाचनालयाला शासनाचा काही लाखांचा पुरस्कार लाभला आहे हे पाहून शासनाचेही कधी नव्हे ते कौतुक वाटले. शासनाचे कौतुक खरेच केले पाहिजे. 


नंतर त्यांनी कार्यक्रमाच्या परीक्षकादि मान्यवरांची ओळख करून दिली. ग्रंथालय समितीचे एक सक्रीय सदस्य श्री. प्रकाश कुशे यांचे छोटेसे पण छान भाषण झाले.



त्यांनी ग्रंथालय संस्थेच्या हस्ताक्षर विकास कार्यशाळा, विद्यार्थ्यांच्या विविध समस्या निवारण कार्यशाळा इत्यादी विधायक उपक्रमांची ओळख करून दिली. त्यामुळे संस्थेच्या कार्याबद्दलचा आणि ते करणार्‍या मान्यवरांबद्दलचा आदर दुणावला.

नंतर त्यानंतर श्रीमती मनीषा इंगळे, एम. ए., बी. एड.  आणि एक अनुभवी शालेय शिक्षक श्रीयुत रामदास नाईक, वाळपई, गोवा, या दोन्ही मान्यवर परीक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून

श्रीमती मनीषा इंगळे दीपप्रज्वलन करतांना, मागे उभे आहेत श्री.रामदास नाईक आणि बाजूला उभ्या ग्रंथालय समिती सदस्या श्रीमती राळकर

आणि नंतर ग्रंथालयाच्या समितीवरील एक सक्रीय सदस्या श्रीमती राळकर यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून  

दीपप्रज्वलन करतांना श्रीमती राळकर, बाजूला उभ्या ग्रंथसेविका दीप्ती

कार्यक्रमाला सुरुवात झाली. आजकाल गायन स्पर्धा, नाच स्पर्धा, सौंदर्य स्पर्धा इ. स्पर्धांना लोकप्रियतेमुळे प्रसिद्धीच्या आणि गर्दीच्या वलयाची झळाळी भरपूर असते. त्यामानाने वक्तृत्व स्पर्धेसाठी तुरळकच उपस्थिती असते. (खासकरून छोट्या शहरात. लेखनवाचन, साहित्य, अभिजात कला इ. विषयी जनमानसातली अनास्था तीही समाजातल्या बौद्धिकतेचा अभिमान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात; ही गोष्ट तशी मला चटका लावूनच गेली.) अशा समाजात कोणत्याही कौतुकाची अपेक्षा न करता वाचनालयातल्या संस्था अजून तग धरून आहे हे पाहून संस्थेसाठी झटणार्यार मंडळींचे कौतुक वाटले. या संस्थेला शासनाचा पुरस्कार देखील मिळाला आहे.

स्पर्धेतली दोन शाळकरी मुलींची उमेदवारी उल्लेखनीय होती.




प्रथम उपरोल्लेखित श्रीमती राळकर यांचे भाषण झाले. तुरळक उपस्थितीमुळे नाउमेद न होता आपला सहभाग उत्साहाने घ्या. तालुका स्तरावरील या स्पर्धेतील पहिले तीन उमेदवार पुढच्या – जिल्हा स्तरावरील स्पर्धेत जाणार आहेत. त्या स्तरावर जास्त उपस्थिती असणार आहेत. १००० मीटर स्पर्धा जर पूर्ण करता आली नाही तर कधीही खेद बाळगू नये. आपण ८०० मीटर धावू शकतो हे तर आपल्याला कळले आहे. पुढील स्पर्धेत आपण १००० मीटर पूर्ण करू याचा आत्मविश्वास मिळवा. असे मोलाचे मार्गदर्शन करून श्रीमती राळकर यांनी स्पर्धकांचा आत्मविश्वास वाढवला आणि स्पर्धा सुरू होत असल्याचे जाहीर केले. जरी विषय श्री. ना. पेंडसे यांच्या कादंबर्‍या. जरी हा विषय असला तरी गुणात्मक दृष्ट्या ही वक्तृत्त्वस्पर्धा आहे हे सर्व स्पर्धकांनी ध्यानात घ्यावे अशी त्यांनी मोलाची सूचना केली.

पहिले भाषण कु. मैत्रेयी बांदेकर हिचे झाले. नीटनेटक्या सोप्या शब्दयोजनेला उत्कृष्ट आवाजाची आणि त्याच्या समर्पक चढउताराची जोड यामुळे तिचे भाषण रंजक आणि श्रवणीय झाले. स्पर्धेची सुरुवात तर जोरदार झाली. नंतर इतर स्पर्धकांची भाषणे झाली. इतर भाषणे देखील चांगली झाली. तरी मैत्रेयीच्या भाषणाची सर मात्र त्या भाषणांना आली नाही. नंतर स्पर्धेचा निकाल येईपर्यंत उपस्थितांपैकी एकदोघांची भाषणे झाली.

तेवढ्यात आणखी एक स्पर्धक मुलगी येऊन पोहोचली. काही कारणामुळे तिला उशीर झाला होता. तरी ती उपस्थित राहिली हे विशेष. परंतु स्पर्धा पूर्ण झाली असून ती आता स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही असे परीक्षकांनी जाहीर केले. परंतु तिला निदान भाषणाची तरी संधी द्यावी अशी उपस्थितांपैकी श्री. शरद कदम 


यांनी आयोजकांना विनंती केली. निदान तिला बोलण्याचा अनुभव मिळावा म्हणून. ती मान्य करून आयोजकांनी मनाचा मोठेपणा दाखवला.  त्यानंतर श्रीमती मनीषा इंगळे, एम. ए., बी. एड.  आणि एक अनुभवी शालेय शिक्षक श्रीयुत रामदास नाईक, वाळपई, गोवा, या दोन्ही मान्यवर परीक्षकांची भाषणे झाली  

आणि त्यांनी निकाल जाहीर केला. बक्षीस न मिळालेल्यांना नाउमेद होऊं नये, ही पुढील यशाची पायरी आहे असे समजावे असे देखील परीक्षकांनी सांगितले. अपेक्षेनुसार मेत्रेयी बांदेकर हिचा प्रथम क्रमांक आला. आज स्पर्धेत बोलायचे आहे हे तिला त्याच दिवशी सकाळी नऊ वाजता कळले होते. त्यानंतर तिने मामुली तयारीवर एवढे उत्कृष्ट भाषण केले याचे सर्वांनाच कौतुक वाटले. 

समारोपाच्या छोट्याशा भाषणानंतर एक नीटस कार्यक्रम संपन्न झाला.      
 
- X – X – X –